“वय नाही अडथळा, जिद्दच खरी ताकद” – शेतकरी कुटुंबातील दोन महिलांचे ३५ व्या वर्षी १२ वी परीक्षेत दैदिप्यमान यश!

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे भेटतात का नाही?

नक्की तुमचं मत मांडा

Batmicare 27 Maharashtra

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेत मिराबाई दादासाहेब भागडे आणि शितल गोरख ननवरे या दोन जिद्दी महिलांनी उत्तुंग यश संपादन करून एक प्रेरणादायी उदाहरण घालून दिले आहे. विशेष म्हणजे या दोघीही शेतकरी कुटुंबातील असून त्यांचे वय सुमारे ३५ ते ३६ वर्षांच्या दरम्यान आहे. आयुष्याच्या या टप्प्यावरही शिक्षणाची आस मनात ठेवून त्यांनी पुन्हा अभ्यासाला सुरुवात केली आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर यश संपादन केले.

घरची जबाबदारी, शेतीची कामे, कुटुंबाची काळजी आणि सामाजिक बंधने यांचा सामना करत त्यांनी शिक्षणाचा ध्यास सोडला नाही. दिवस-रात्र कष्ट करत, वेळेचे योग्य नियोजन करून त्यांनी अभ्यासासाठी वेळ काढला. अनेक अडचणी, मर्यादा आणि परिस्थितीची कठीणता यांवर मात करत त्यांनी हे यश मिळवले आहे.

मिराबाई भागडे आणि शितल ननवरे या दोघींनाही समाजकार्याची विशेष आवड असून, भविष्यात शिक्षणाच्या बळावर समाजासाठी काहीतरी करण्याची त्यांची इच्छा आहे. त्यांच्या या यशामुळे त्यांच्या कुटुंबासह गावात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.

त्यांच्या या कर्तृत्वामुळे केवळ महिलाच नव्हे तर प्रत्येक वयोगटातील व्यक्तींना शिक्षणाची प्रेरणा मिळत आहे. “शिकण्याला वयाचे बंधन नसते” आणि “जिद्द, मेहनत आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय गाठता येते” हा संदेश त्यांच्या यशातून स्पष्टपणे दिसून येतो.

मिराबाई आणि शितल यांच्या या यशोगाथेमुळे ग्रामीण भागातील महिलांसाठी एक नवी दिशा निर्माण झाली असून, शिक्षणाच्या क्षेत्रात त्यांनी एक आदर्श निर्माण केला आहे.

Leave a comment