लाडकी बहीण योजना : e-KYC मध्ये चूक झाली असेल तरी घाबरू नका, घरपोच पडताळणी होणार अंगणवाडी सेविका
बातमी केअर महाराष्ट्र
लाडकी बहिणींकरिता दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत e-KYC प्रक्रिया पूर्ण करूनही अनेक महिलांना लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, e-KYC दरम्यान तांत्रिक चूक झालेल्या किंवा चुकीचा पर्याय निवडलेल्या लाभार्थी महिलांची प्रत्यक्ष (Physical Verification) केली जाणार आहे.
क्षेत्रीय पातळीवर पडताळणी
महिला व बालविकास विभागाने यासंदर्भात राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आढळल्या आहेत, त्यांच्या घरी अंगणवाडी सेविका भेट देऊन आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणार आहेत. लाभार्थी महिलेची पात्रता निश्चित झाल्यानंतरच पुढील हप्ता देण्याची कार्यवाही केली जाणार आहे.
e-KYC का झाली अनिवार्य?
राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, तसेच त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्याच्या उद्देशाने ही योजना राबवली जात आहे. या योजनेचा लाभ केवळ पात्र आणि गरजू महिलांनाच मिळावा, यासाठी e-KYC प्रक्रिया अनिवार्य करण्यात आली होती. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली होती. मात्र, माहिती भरताना झालेल्या चुकांमुळे अनेक पात्र महिला लाभापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले.
मंत्री अदिती तटकरेंनी काय सांगितले?
या निर्णयाबाबत माहिती देताना अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की, e-KYC करताना काही लाभार्थींनी चुकीचा पर्याय निवडल्याने अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळेच आता योजनेच्या निकषांनुसार अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, जेणेकरून कोणताही पात्र लाभार्थी वंचित राहू नये.
जिल्हाधिकाऱ्यांना कडक निर्देश
राज्य सरकारने ही मोहीम युद्धपातळीवर राबवण्याचे आदेश दिले आहेत. पात्र महिलांना लाभ मिळावा आणि अपात्र व्यक्तींना योजनेपासून दूर ठेवावे, यासाठी पारदर्शक व काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
लाभार्थींना आवाहन
ज्या महिलांच्या अर्जात त्रुटी आहेत किंवा अद्याप दुरुस्ती झालेली नाही, त्यांनी आपल्या परिसरातील अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. या निर्णयामुळे योजनेतील अडथळे दूर होऊन खऱ्या गरजू लाडक्या बहिणींना आर्थिक लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.


